अविश्वसनीय ! अंत्यविधी सुरू असताना 95 वर्षांचे आजोबा उठून बसले 

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील एक आश्चर्यचकित करणारा प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच आजोबा उठून बसल्याही घटना घडली आहे. जयपूरमधील ही घटना आहे. गुर्जर कुटुंबातील 95 वर्षांच्या आजोबांना मृत घोषित करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच निपचित पडलेले आजोबा अचानक उठून बसले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी घटना आहे.

बुद्धराम असं या आजोबांचं नाव आहे. गुर्जर कुटुंबातील हे आजोबा शनिवारी दुपारी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आजोबांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांनीही अंत्यसंस्काराची तयारी केली. विशेष म्हणजे अंत्यविधी सुरू केल्यानंतर सदस्यातील पुरुष मंडळींनी मुंडनही करून घेतले. त्यानंतर बुद्धराम आजोबांना नखशिखान्त आंघोळ घालण्यात आली. इतकेच नाही तर आंघोळीचं पाणी अंगावर पडल्यानंतर आजोबांच्या शरीरातून काहीशी हालचाल जाणवली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पलंगावर नेऊन झोपवलं आणि थोड्याच वेळात ते उठून बसले. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण होता. नातेवाईकांनी त्यांची आस्थेवाइकपणे चौकशी केली असता, छातीत दुखू लागल्यानं झोपलो होतो, असं त्यांनी उत्तर दिलं.

वडील पुन्हा जिवंत झाल्यानं मुलगा बाळू राम याचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. “यंदाची दिवाळी आमच्यासाठी खास आहे. वडिलांच्या निधनामुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकत नव्हतो. परंतु आता वडिलांबरोबरच दिवाळी साजरी करू” असे धाकटा मुलगा म्हणाला आहे.