अनेक गुन्ह्यांचा छडा लावणारी ‘राणी’ पोलीस खात्यातून होतेय निवृत्त

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन-अनेक गुन्ह्यांचा उकल करणारी आणि अनेक गुन्हेगारांना तुरुंगात धाडणारी पुणे ग्रामीण पोलीसांच्या गुन्हे शोधक श्वान पथतकातील ‘राणी’ लवकरच निवृत्त होतेय. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोधक श्वान पथकात दाखल झालेली ‘राणी’ नावाची पोलीस श्वान पुढील आठवड्यात निवृत्त होते आहे. आपल्या १० वर्षांच्या सेवेत राणी श्वानाने अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.

पोलीस दलात दाखल झाल्यानंतर नऊ महिन्यांचे शिस्तबद्ध पोलीस प्रशिक्षण असलेले लॅबराडोर जातीचे राणी श्वान म्हणजे पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील  गुन्हे शोधक श्वान पथकाची  शान. गेल्या १० वर्षांत अनेक गुन्ह्यांचा छडा लावणारी राणी आता निवृत्त होणार आहे. केवळ दोन महिन्यांची असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकात ती दाखल झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत पोलीस श्वान ही पदवी राणीने अगदी ‘लिलया’ पेलली आहे. गेल्या दहा वर्षात राणीने अनेक धक्कादायक गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. राणी पुढील आठवड्यात १७ नोव्हेंबर २०१८ रोजी पोलीस दलातून निवृत्त होणार आहे.

चाकण जवळील मोहितेवाडी येथील अनोळखी उसतोड महिला कामगाराच्या खून प्रकरणात राणी श्वानाने काढलेल्या एका झोपडीचे मागावरून या महिलीचे आणि खुन्याची ओळख पटली होती. खेड तालुक्यातील आव्हाटवाडी खून प्रकरणात घटनास्थळी मिळून आलेल्या चपलेचा वास राणी श्वानाला दिल्यानंतर एक किलोमीटर अंतरावरील आरोपीच्या घरापर्यंत या श्वानाने माग काढून ओळख परेड मध्ये चक्क आरोपी शोधला होता. पुणे सत्र न्यायालयाने राणी श्वानाने दिलेल्या या पुराव्यावर शिक्कामोर्तब करून खून प्रकरणी आरोपीला शिक्षा झाली होती. बारामती मधील भांबुर्डी येथील चिंकारा शिकार प्रकरणी घटनास्थळी मिळून आलेल्या दोरखंडाच्या वासावर राणी श्वानाने दोन ते तीन किमी अंतरावरील आरोपीच्या घरापर्यंत माग काढला होता. शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथील महिलेच्या खून प्रकरणात ओळखपरेड दरम्यान पाचारण करण्यात आलेल्या राणीने आरोपी पकडून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. शिरूर मधीलच एसबीआय बॅंकेवरील दरोडा, दौंड तालुक्यातील दरोड्यातील आरोपींचा छडाही याच श्वानाने लावला होता.

जेजुरी येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणात राणी श्वानाने घटनास्थळावरील ब्लेडच्या वासावर अर्धा किमी अंतरावरील संशायीत आरोपीच्या घराचा माग काढला होता. पोलिसांनी संबंधित संशयिताकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित आरोपीस सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

पोलीस दलातील गणेश फापाळे  यांनी राणीचे हँडलर (हस्तक) म्हणून काम पाहिले आहे. फापाळे यांनी सांगितले कि, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार व एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध गुन्ह्याच्या तपास कामात गुन्हे शोधक  श्वान पथकात राणी श्वानाकडून चांगली कामगिरी करून घेण्यात आली आहे. पोलीस कर्तव्य मेळाव्यात तीनदा राणीला पदक मिळाले आहे. पुढील आठवड्यात १७ नोव्हेंबर २०१८ रोजी राणी पोलीस दलातून निवृत्त होणार आहे. नवीन श्वानाची भरती करण्यात येईल. मात्र  गेल्या १० वर्षांपासून राणीचा चांगलाच लळा लागला होता. त्यामुळे निवृत्तीनंतरही  पोलीस कर्मचारी फापाळे हे स्वतः राणीची देखभाल करणार आहेत.