मतिमंद मुलीवर सामुहिक अत्याचार ; ५ तासात नराधमांच्या आवळल्या मुसक्या

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – शहादा शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मतिमंद युवतीवर अत्याचार करणाऱ्या तीन संशयितांना शहादा पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत युवती हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या पाच तासात पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत नराधमांना जेरबंद केले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात राहणारी एका १६ वर्षीय मतिमंद युवती दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तिचा शोध लागला नाही. रात्री १२ वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक संजय शुक्ला रात्रीच्या गस्तीवर असताना तेथे काही नागरिक आपापसात चर्चा करत असताना शुक्ला यांनी त्यांना विचारपूस केली. त्यांनी दुपारी घरुन गेलेली अल्पवयीन मतिमंद युवती अद्याप घरी परतलेली नसल्याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक शुक्ला यांनी रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला तात्काळ याबाबत कळविले. तसेच नातेवाईकांना सोबत घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. याच दरम्यान पहाटे चार वाजेच्या सुमारास सदर युवती शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील भेंडवा नाल्याच्या पुलाखाली भयभीत अवस्थेत दिसून आली.

नातेवाईकांनी तिची ओळख पटविल्यानंतर तीची तपासणी करण्यात आली. तपासणीत तिच्यासोबत बळजबरी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने पोलिसांनी तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. तिची शारीरिक तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.स्थानिक खबरी व माहितीगारांच्या मदतीने तसेच काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाला वेग देत भेंडवानाला परिसरातच शोध घेतला असता मतिमंद युवतीवर अत्याचार करणारे तिघेही संशय पोलिसांच्या जाळ्यात अडकले.