सुपीक डोक्यालिटी…’ईएमआय’वर करा सत्यनारायण पूजा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – आतापर्यंत घर, गाडी, फर्निचर अशा अनेक वस्तू ईएमआय वर खरेदी करता येतात हे तर तुम्हाला माहीत आहेच पण आता नाशिकच्या एका पठ्ठ्याने चक्क सत्यनाराण पूजेकरिता ईएमआय ची स्कीम आणली आहे. धार्मिक विधीची सुलभ हप्त्यांची ही कल्पना नाशिक मधील अनिकेत शास्त्री  यांनी आणली आहे. या अंतर्गत सत्यनारायण पूजेबरोबरच बारसे तसेच इतर  धार्मिक कार्यक्रम सुलभ हप्त्याने ( ईएमआय ) करता येणार आहेत.

घरात सत्यनारायण पूजा किंवा मोठे धार्मिक कार्यक्रम करायचे म्हटले तर पैशांची चणचण भासते. घर खरेदी करण्यासाठी आधीच अमाप पैसा खर्च झालेला असतो. त्यावेळी कोणाकडून पैसा मागायला सुद्धा लाज वाटते. परंतु, आता कोणापुढेही हात पसरवयाची वेळ येणार नाही. अनिकेत शास्त्री यांनी धार्मिक विधीचे सर्व कार्यक्रम ईआयएमवर उपलब्ध केले आहेत. देशात पहिल्यांदाच सुलभ हप्त्याने धार्मिक विधी करणारे नाशिक हे पहिले शहर बनले आहे.

धार्मिक विधीसाठी सहा महिने, आठ महिने व बारा महिने अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विधी पार पडल्यानंतर ईआयएमच्या रुपाने दक्षिणा देता येणार आहे.