बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न सोडण्याचे आदेश

पिंपरी : अमोल येलमार : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातील कामात चांगले असणारे अधिकारी व कर्मचारी काढून घेण्यात आले. यामुळे या अधिकाऱ्यांनी जायचे कुठे हा प्रश्न दहा दिवस झाला सुरु आहे. अखेर बदल्या झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोडू नये असे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी हा प्रश्न सुटला असे शहर पोलीस म्हणत आहेत. मात्र या आदेशात पुणे ग्रामीणचा काही उल्लेख नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

[amazon_link asins=’B01MU2AVOR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2250e33-a75f-11e8-b4eb-b93d198720bf’]

पुणे शहर आणि ग्रामीणचा भाग घेऊन तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सुरुवातीला २२०७ पदे मंजूर झाली आहेत. पैकी १८५५ ही पुणे शहर तर ३५२ ही पुणे ग्रामीण पोलीस दलातून वर्ग केली जाणार होती. यामुळे १४ ऑगस्टला रात्री आणि १५ ऑगस्टच्या पहाटे याची यादी निघाली. पुणे ग्रामीणमधून आलेल्या चाकण, आळंदी, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव आणि देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी काढून इतर देण्यात आले. यातील दोन पोलीस निरीक्षक तत्काळ पुणे ग्रामीण मुख्यालयात हजर झाले. मात्र इतर अधिकारी, कर्मचारी हजर झाले नाहीत की त्यांना हजर होण्याचे आदेश मिळाले. संबंधीत पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी हा विषय वरिष्ठ पातळीवरील असल्याने तुम्ही पाहा असे म्हणून हात वर केले. त्यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ससेहोलपट सुरु आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त, उपायुक्त यांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे तिथेच काम करण्यास सांगितले आहे. तसेच आम्हाला आहे त्याच पोलीस ठाण्यात काम करायचे असल्याचे त्यांनी लेखी अर्ज वरिष्ठांकडे दिले आहेत.

पुणे शहर पोलिसांनीही चांगली शाळा केली. स्वतंत्र आयुक्तालय होण्यापूर्वी कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी आपण आता इकडे वर्ग होणार या विश्वासात होते. मात्र तसे न होता पुणे आयुक्तालयातून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी काढून घेतले. अनेक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयात दाखवली नाही. त्यामुळे शहर आणि ग्रामीणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणालाही सोडले नाही. उलट सर्वांचे याच ठिकाणी काम करायचे असल्याचे अर्ज घेण्यात आले आहेत.

या सगळ्या सावळ्या गोंधळावर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशामुळे काहीशी शांतता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये नियुक्ती न दाखवलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना न सोडण्याचे आदेश संबंधीत उपायुक्त, सहायक आयुक्तांना दिले आहेत. तसेच आहे त्या ठिकाणीच काम करण्यास सांगितले आहे. मात्र यामध्ये ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा उल्लेख नसल्याचे त्यांच्यात संभ्रमावस्था आहे.