काश्मीरमध्ये हिमस्खलन ८ पोलीस बेपत्ता

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्‍टी झाल्यामुळे ८ पोलिस बेपत्‍ता झाले होते. ही घटना कुलगाम जिल्‍ह्यातील पोलिस चौकीजवळ घडली आहे. हिमाचलप्रदेश अणि जम्‍मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्‍टी होत होती.

या हिमवृष्‍टीमुळे गुरुवारी हिमस्खलनही झाले. कुलगाम जिल्‍ह्यातील जवाहर पोलिस चौकीजवळ हिमस्खलन झाल्यामुळे यात दहा पोलिस कर्मचारी अडकले होते. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यास सुरवात झाली होती. बचाव पथकाने शुक्रवारी दोघांना बर्फाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले असून त्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सतत हिमवृष्‍टी होत असल्‍याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. अद्याप काश्मीर व्हॅलीमध्ये बुधवारपासून जोरदार हिमवर्षाव होत आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडला असून जिल्ह्यातील काही ठिकाणी पाच फूटापर्यंत बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.