किरकोळ कारणावरुन सराईत गुन्हेगाराचा युवकावर हल्ला

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील गवळी गल्लीत तिघांना दंगा करू नका असे सांगितल्याने एकावर चाकूने वार करून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये योगेश शामराव नागे (वय 35) जखमी झाला  आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका रेकॉर्डवरील गुंडाला अटक केली आहे. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पवन ऊर्फ पवन्या धर्मेंद्र साळुंखे (वय 24, रा. राजीव गांधी झोपडपट्टी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत योगेश नागे याने फिर्याद दिली आहे. नागे याचा टुर्स एजन्सीचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री तो दुकान बंद करून जात असताना त्यांच्या दुकानासमोरच पवन आणि त्याचे साथीदार दंगा करत बसले होते. त्यावेळी नागे याने त्यांना येथे दंगा करू नका असे सांगितले.
[amazon_link asins=’B079X4P219′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d89c8f74-d09a-11e8-8e77-0f437eebc420′]
याचा राग आल्याने पवन्याने त्याला जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढत गेला. नंतर पवन्याने खिशातील चाकू काढून नागेच्या मानेवर आणि पोटावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. नंतर पवन्यासह त्याचे साथीदार तेथून निघून गेले. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यातील आणखी दोन संशयित पसार झाले आहेत.

संशयितावर घरफोड्यांचे गुन्हे…
खुनी हल्ल्यातील संशयित पवन साळुंखे याच्यावर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा यासारखे डझनाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या प्रयत्नाचा पहिलाच गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर भविष्यात मोक्कांतर्गत कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.