हेल्मेट सक्तीविरोधात वैकुंठ स्मशानभूमीत हेल्मेटचा दशक्रिया विधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हेल्मेटसक्तीला १० दिवस पूर्ण होत असल्याने आज (मंगळवार) शिवसेनेने काढलेल्या अंत्ययात्रेनंतर हेल्मेटसक्तीचा सर्वपक्षीय दहावा वैकुंठात करण्यात आला. हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून निषेध करण्यात आला.

यावेळी हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक माजी आमदार अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे पदाधीकारी आणि नागरिक उपस्थित होते.

नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करुन लाखोंचा दंड वाहतूक शाखेने वसुल केला आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या हेल्मेट सक्तीला काही लोकांकडून विरोध होत आहे तर काहीजणांकडून याला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान वैकुंठात हेल्मेटला हार घालून त्याच्यापुढे चहा, बिस्कीट, भेळ, वडापाव, पेढे आदींचा नैवेद्य वाहण्यात आला. यावेळी सर्वांनी एकमेकांना बुंदीचे वाटप केले.

पोलिसांनी पुणे शहरात राबवण्यात येत असलेली हेल्मेट सक्ती हे चुकीचे असून ती बंद करावी यासाठी सर्व राजकिय पक्षांकडून मागणी होत आहे. आज हेल्मटचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच हेल्मट कारवाई लवकरात लवकर बंद न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.