‘त्या’ महिलेच्या पायातील पैंजणासाठी तोडले ‘त्यांनी’ पाय

उदयपुर : वृत्तसंस्था – चोरी करण्यासाठी आलेल्या चोराने वृद्धेच्या पायातील पैंजण चोरण्यासाठी चक्क पायच तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरात येथील उदयपूर येथील ही घटना आहे. उदयपुरमधील कालावा परिसरात चोरट्यांनी वृद्ध महिलेचे पैंजण चोरण्यासाठी तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर तिचे पाय देखील तोडण्यात आले. या वृद्ध महिलेचे वय ८० वर्षे होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटी होती. ही संधी साधत चोरांनी त्या वृद्ध महिलेवर हल्ला केला. चोरांनी पहिल्यांदा तिच्या गळ्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर चांदीचे पैंजण चोरण्यासाठी तिचे पाय तोडले. पनवड पोलिस ठाण्यातील एम. के. गोसाई यांनी चोरांचा तपास सुरू असल्याचे सांगितले. लवकरच चोरांना ताब्यात घेऊ असे देखील ते म्हणाले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून चोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच या चोरीमुळे तेथील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.