राजकीय

विखे-पवारांच्या वादात नव्या पिढीची समझोता एक्सप्रेस ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोणीचे विखे व बारामतीचे पवार घराण्यात असलेले छुपे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र आता या घराण्यातील नव्या पिढीने जुना वाद संपुष्टात आणून समझोता एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निमित्त ठरले आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी प्रवरा येथील विखे कारखान्यावर जाऊन डॉ. सुजय विखे यांनी घेतलेल्या भेटीचे.
रविवारी पवार हे डॉ. सुजय विखे यांच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील छुपे राजकीय वैर कधीही लपून राहिले नाही. एकमेकांची कुरघोडी करण्यासाठी त्यांच्याकडून नेहमीच प्रयत्न केला गेला जातो. त्यानंतरच्या पिढीतील अजित पवार व राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा संघर्ष जतन केला. नगर दक्षिणेची जागा काँग्रेसने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी मागितली जात असली, तरी राष्ट्रवादी या जागेवर ठाम आहे. जागा सोडण्याची पक्षश्रेष्ठींची तयारी नाही. त्यामुळेच विखे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी भाऊबंदकीतील वादाचा फायदा घेत शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून डॉ. अशोक विखे पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची ऑफर दिली होती, अशी चर्चा आहे.

पक्षपातळीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा जागावाटपाचा तिढा अजून अंतिम झालेला नाही. अशा परिस्थितीत डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कसल्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवायची, या भूमिकेत विखे आहेत. अलीकडच्या काही दिवसांपासून निवडणुकीची जोरदार तयारीही त्यांनी सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संपर्क कार्यालये आहेत.

दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे. विखे यांचा विरोध पत्करून कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढविणे पवार यांना सोपे जाणार नाही. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आव्हान व विखे यांनी विरोधात काम केल्यास रोहित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. रोहित हे पवार घराण्यातील असल्याने त्यांचा पराभव स्वीकारणे राष्ट्रवादीच्या पचनी पडणारे नाही. त्यामुळेच कदाचित लोकसभेला विखे यांना मदत करायची व विधानसभेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विखेंचे सहकार्य घ्यायचे, या राजकीय भूमिकेतूनच रोहित पवार हे प्रवरानगर येथे डॉ. सुजय विखे यांच्या भेटीला आले असावेत असे राजकीय जाणकारांडून सांगितले जात आहे. रोहित पवार व डॉ. सुजय विखे यांची समझोता एक्स्प्रेस पवार-विखे घराण्यातील वैर संपुष्टात आणते की काय, असे आता वाटू लागले आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या