जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्यालयातील १५ हून अधिक मुलांना मारहाण करून रॅगिंग करणाऱ्या सात मुलांवर केंद्रीय विद्यालयाच्या पुणे उपायुक्तांनी कारवाई केली आहे. त्यांना सातारा, रायगड, गोवा येथील नवोदय विद्यालयात स्थलांतर होण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिला आहे. यापैकी पाच विद्यार्थी जाण्यास तयार झाले असून दोघांनी नकार देऊन स्थानिक खासगी शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यामध्ये हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रेक्टरनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विद्यालयामधील वसतिगृहातील अकरावीच्या सात विद्यार्थ्यांनी १४ डिसेंबर २०१७ रोजी रात्री सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्या, काठ्या, लोखंडी रॉड, विटांनी मारहाण करीत रॅगिंग केले होते. या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला होता. अहवालात रॅगिंग केल्याचे समोर आल्यामुळे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी रॅगिंग करणाऱ्या सात विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढावे, असा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठवला. त्यावर आयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. सातजणांना विद्यालयातून काढण्याचा आदेश प्राचार्य राव यांनी दिला. गुरूवारी विद्यार्थ्यांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले.

यातील पाच जणांचे रायगड, गोवा व सातारा येथील जवाहर नवोदयच्या शाळेत स्थलांतर केले. तर उर्वरित दोघाजणांनी जायला नकार देत खासगी शाळांमध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे.

या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होऊ नये, यासाठी निलंबनाऐवजी या शाळेतून बाहेर काढण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तसेच रेक्टरच्या निष्काळजीपणामुळेच इतकी मोठी घटना घडल्याने त्यास जबाबदार धरून त्यांनाही उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.