…तर १ डिसेंबरनंतर असहकार आंदोलन करणार : सकल मराठा समाज

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – आरक्षण ही मराठा समाजाची प्रमुख मागणी होती. समाजाच्या अन्य मागण्या अद्याप बाकी आहेत. कोपर्डीच्या बहिणीला अद्यापही न्याय मिळलेला नाही; मग आम्ही जल्लोष कसा करायचा, ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर १ डिसेंबरनंतर असहकार आंदोलन करू, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. कोल्हापूर येथील शासकीय विश्रांतीगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे प्रतिनिधी म्हणून अमर पाटील उपस्थित होते. ते म्हणाले, खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाची बाजू नेहमीच मांडली आहे. राज्यासह संसदेच्या प्रांगणातही आंदोलन केले आहे. ते आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. खा. राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी भगवान काटे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, मराठा समाजात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची अवस्था दयनीय आहे. गेल्या ८-९ वर्षांपासून आम्ही आरक्षणासाठी आग्रही आहोत. आरक्षणाची मागणी खासदार राजू शेट्टी लावून धरत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक यांचे प्रतिनिधी मकरंद बोराटे यांनीही आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी १ डिसेंबर रोजी दसरा चौकामध्ये पुन्हा जमण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस नगरमधून प्रारंभ 

बैठकीत उमेश पोवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आजवर लोकप्रतिनिधींनी सरकारकडे समाजाची भावना मांडली आह. आज जरी आपल्या व्यस्ततेमुळे ते बैठकीस उपस्थित राहिले नसले तरी ते समाजाबरोबर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करण्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळालेला नाही, त्याच बरोबर समाजाच्या अन्य मागण्याही प्रलंबित आहेत.

तर बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यात १४७ आमदार मराठा समाजाचे आहेत. त्या सर्वांनी पक्षभेद विसरून आरक्षणाच्या प्रश्न एकत्र येणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल तयार झाला आहे; मात्र हा निर्णय विधिमंडळात मार्गी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी, सरकारने समाजाची फसवणूक करू नये.

विनोद साळोखे म्हणाले, राज्यभर झालेल्या आंदोलनांमध्ये तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते तत्काळ मागे घ्यावेत. कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळल्याशिवाय आम्ही जल्लोष करू शकणार नाही. बैठकीस नगरसेवक प्रताप जाधव, संदीप पाटील, फत्तेसिंह सावंत, गणी आजरेकर, अनिकेत चव्हाण, जयकुमार शिंदे, अमोल गायकवाड उपस्थित होते.