यापुढे ‘१० वी’च्या परीक्षेत इंग्रजी, गणिताचा एकच पेपर

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – राज्यात यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला पुनर्रचित अभ्यासक्रमामुळे इंग्रजी द्वितीय आणि तृतीय भाषा व गणित भाग १ व भाग २ या विषयांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. हा नियम मार्च २०१९ च्या परीक्षेला लागू असणार आहे. सन २००४ पासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धती लागू करण्यात आली होती. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना चार प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्या जात असत. यामुळे कॉपीच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती.

यावर्षी बालभारतीने इयत्ता नववी व दहावीसाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे. त्याआधारे पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना काही प्रमुख रचनात्मक बदल केले आहेत. यंदाच्या कृतिपत्रिकांमध्ये आकलन, उपयोजन, रसग्रहण मत व्यक्त करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित आणि पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रश्नांचाही समावेश असणार आहे.

यामुळे कृतिपत्रिकांची अंमलबजावणी आणि मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियांमध्ये सुलभता राहावी यासाठी इयत्ता दहावीसाठी इंग्रजी द्वतीय व तृतीय भाषा आणि गणित भाग १ व भाग २ या विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिकेची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय विषयतज्ज्ञ आणि बालभारती कार्यालयाकडून मिळाला आहे. यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या दोन विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिका न ठेवता एकच प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे.

नोकरीचं अमिष दाखवून जोडप्यानं केली १० लाखाची फसवणूक