सांगली : कुत्र्याचा चावा पडाला सहा हजारांना, ३ वर्षांनी निकाल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

कुत्रे चावल्याबद्दल कुत्र्याच्या मालकाला 6 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. एस. एम. पखाली यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, दिनांक 10 एप्रिल 2015 रोजी सकाळी साडे नऊ वाजता भिमाशंकर हणमंतराव तारापुरे (रा.7 वी गल्ली, विनायकनगर, सांगली) हे सायकलवरुन बँकेकडे चालले होते. त्यावेळी वारणाली रस्त्याने जात असताना त्यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठोपाठ येणार्‍या अन्य चौघांना देखील याच कुत्र्याने चावा घेतल्याने ते चौघेजण जखमी झाले. याबाबत तारापुरे यांनी कुत्र्याच्या मालकाला जाब विचारला. त्यावेळी त्यांना कुत्र्याच्या मालकाने उध्दटपणाने उत्तर दिले. याप्रकरणी तारापुरे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी कुत्र्याचे मालक विठ्ठल महादेव साखरे (वय 43) व गोविंद महादेव साखरे (वय 41 दोघे रा. विनायकनगर, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
[amazon_link asins=’B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’faf2aa13-a2f3-11e8-9701-ad0f2393e02f’]

या खटल्यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारपक्षाला हवालदार फिरोज हुजरे व संदीप मोरे यांनी मदत केली. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. भा. द. वि कलम 289, 323 व 504 अन्वये शिक्षा सुनावली. कलम 289 अन्वये 1 हजार रुपये व 323 अन्वये 5 हजार रुपये तसेच 504 अन्वये 1 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा भोगण्याच आदेश न्यायालयाने दिले. दंडाच्या रकमापैकी 4 हजार रुपये फिर्यादी भिमाशंकर तारापुरे यांना देण्याचे आदेश देण्यात आले. पाळीव प्राण्यापासून कोणास धोका होणार नाही याची योग्य ती काळजी घेणे प्राण्याच्या मालकाची असल्याचे मत न्यायाधीश जवळगेकर यांनी नोंदविले.