अनिल राठोडांनी स्वतःच्या पक्षात लक्ष घालावे : संग्राम जगताप 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन  – शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केलेल्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. अनिल राठोड यांना झोपता-उठता राष्ट्रवादीचे नेतेच दिसतात. त्यांनी आमच्या पक्षात डोकावण्यापेक्षा आपल्या पक्षाचे पहावे. त्यांनी पक्षनिष्ठा आम्हास शिकवू नये, अशी खोचक टीका संग्राम जगताप यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी जगताप पिता-पुत्रावर पैसे घेवून भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना जगताप यांनी राठोडांवर टीका केली आहे. महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय केवळ माझा व नगरसेवकांचा होता. त्यात डोके घालण्याचे राठोड यांचे कारण नाही, असं त्यांनी म्हटलं. गेल्या साडेचार वर्षात शहराचा विकास केला नाही. ते आता काय विकास करणार, त्यापेक्षा भाजपने किमान तीनशे कोटी जाहीर केले आहेत. त्यामुळे शहराचा विकास तरी होईल. म्हणून आम्ही भाजपला साथ दिली. शिवसेनेचे जास्त नगरसेवक असताना त्यांचा महापौर होऊ शकला नाही, याचे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ते आमच्यावर उठसुट आरोप करीत आहेत, असं जगताप यांनी म्हटलं आहे.

आम्ही वरिष्ठांशी काय बोललो, हे शिवसेनेला पहाण्याची गरज नाही. आमच्या पक्षांतर्गत हा मामला आहे. भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मागितलेला खुलासा आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या इच्छेनुसार केला आहे, असंही जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, जगताप यांच्या या खोचक टीकेवर राठोड काय प्रत्युत्तर देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.