‘मुन्नाभाई ३’ मधून मुन्ना -सर्किट ची जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांचा भेटीला  

मुंबई : वृत्तसंस्था – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अर्शद वारसीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत ‘मुन्नाभाई ३’ च्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ ( २००३) आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ (२००६) या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.  या चित्रपटानंतर ‘मुन्नाभाई ३’साठी जवळपास १० वर्षांहून अधिक काळ लागला. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच संजय दत्त आणि अर्शद हे मुन्नाभाई व अर्शद सर्कीटच्या भूमिकेत असेल.
‘चित्रपट झाल्यानंतर त्या भूमिकेला मी विसरून जातो. त्यामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’ तील सर्कीटसाठीही मला फार वेळ लागला. पुन्हा पुन्हा पहिल्या चित्रपटातील दृश्ये बघून मी ती भूमिका साकारली होती. आता त्याहून जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे जून किंवा वर्षाअखेरीस शूटिंगला सुरुवात होईल,’ असं अर्शदने सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मुन्नाभाई आणि सर्कीटची धमाल जोडी पाहायला मिळणार हे नक्की. तसेच गोलमाल सीरिजमधला ‘गोलमाल ५’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं अर्शदने सांगितलं आहे.