मोदी स्वतःची तुलना वाजपेयींशी करतात हीच मोठी शोकांतिका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी स्वतःची तुलना माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयींशी करतात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, अशी खोचक टीका तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. तसंच, त्यांच्या नेतृत्त्वाखाली कोणतीही आघाडी कार्यक्षमपणे काम करू शकत नाही. त्यामुळे आमचा पक्ष भाजपशी कधीच आघाडी करणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तामिळनाडूतील बूथस्तरावरील कार्यकर्त्यांशी मोदींनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रादेशिक पक्षाशी आघाडी करून आघाडी सरकारचा आदर्श घालून दिला होता. प्रादेशिक पक्षांच्या आशा-आकांक्षांना अटलबिहारी वाजपेयी यांनी महत्त्व दिले आणि त्यांच्या मदतीने आघाडी सरकारचे मॉडेल 20 वर्षांपूर्वी तयार केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मार्गावरूनच भाजपने आतापर्यंत मार्गक्रमण केले आहे, असं मोदींनी म्हटलं होतं.तसंच भाजप लोकसभा निवडणुकीसाठी डीएमके किंवा एआयएडीएमके किंवा रजनीकांत प्रस्तावित पक्षापैकी एकाशी आघाडी करणार का?, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने मोदींना केला होता. त्यावर मोदींनी आघाडी करणार असल्याचे संकेत दिले होते.

2014 मधील निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले असूनही आम्ही आघाडीतील पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे जुन्या राजकीय पक्षांसाठी भाजपचे दरवाजे कायम उघडे असतील, असं मोदींनी सांगितलं होतं.मोदींनी दिलेल्या आघाडीच्या संकेतावर स्टॅलिन यांनी वक्तव्य करत, भारतीय जनता पक्षाशी आम्ही कधीच आघाडी करू शकणार नाही, असं मत स्पष्ट केले आहे.