पाडव्याच्या मुहुर्तावर ‘या’ नव्या राजकीय पक्षाची स्थापना

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साडे तीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेल्या पाडव्याच्या दिवशी मराठा समाजाच्या वतीने नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजाने यापुर्वीच पत्रकार परिषद घेवुन पाडव्याच्या दिवशी नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाने ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ नावाचा नवा राजकीय पक्ष आज (गुरूवार) स्थापन केला आहे. सुरेश पाटील यांनी रायरेश्‍वर येथे नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

मराठा समाजाच्या वतीने रायरेश्‍वर येथे शपथ घेवुन पक्षाच्या बांधणीला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स यावेळी ठिकठिकाणी पहावयास मिळाले. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध होता. तो डावलून या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, मराठा मार्चाने या नवीन राजकीय पक्षाच नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असे ठेवण्यास विरोध केला.

या नावांमध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या नवीन राजकीय पक्षाचे नाव ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे ठेवल्याचे सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना सुरेश पाटील म्हणाले की, खासदार उदयनराजेंचा पक्षाला पाठिंबा असून आगामी लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे हे आमच्या पक्षत्तचे उमेदवार असू शकतात. आमच्या पक्षाकडून खा. उदयनराजेंनी निवडणूक लढवावी अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. पक्षाच्या वतीने लोकसभा, विधानसभा निवडणूका लढवून समाजाच्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे पाटील यांनी शेवटी सांगितले.

दरम्यान, रायरेश्‍वरावर प्रचंड गर्दी पहावयास मिळाली. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत या नवीन राजकीय पक्षाचा इतर पक्षांना नक्‍कीच फटका बसेल असे भाकित काही जाणकारांनी केले आहे.