‘या’ इस्लामिक देशाच्या राजपुत्राने मोदींना म्हंटले ‘मोठा भाऊ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘मोदी माझे मोठे बंधू आहेत तर मी त्यांचा लहान भाऊ आहे’, असे म्हणत सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास कौतुक केले आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महंमद बिन सलमान यांचा भारत-पाकिस्तान दौरा खूप महत्वाचा आहे. संरक्षण सहकार्य आणि नौदलाचा एकत्रित युद्ध सराव यासंबंधी दोन्ही देशांमध्ये काही करार होऊ शकतात.
महंमद बिन सलमान मंगळवारी रात्री उशिरा भारतात दाखल झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: विमानतळावर जाऊन महंमद बिन सलमान यांचे स्वागत केले. महंमद बिन सलमान यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. महंमद बिन सलमान म्हणाले कीं, ‘दोन्ही देशांचे हित लक्षात घेता भारत-सौदी अरेबिया संबंधात आणखी सुधारणा झाली पाहिजे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत आणि सौदी अरेबियासाठी आपण खूप चांगल्या गोष्टी करु शकतो हा मला विश्वास वाटतो.’ असे सलमान म्हणाले.

हेही वाचा – ‘जास्तच पश्चाताप होत असेल तर तुमची ४० लोकं फाशीसाठी द्या’ 

सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान अरब जगतातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. भावी राजे म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यापासून सलमान आशिया खंडात प्रथमच येत आहेत. आपल्या या दौऱ्याची सुरुवात त्यांनी पाकिस्तानपासून केली. सलमान यांनी नुकत्याच झालेल्या दौर्‍यात पाकसोबत २० अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करार करण्यात आले. तसेच पाकिस्तानला भरघोस मदत केली आहे. सौदीकडून पाकिस्तानला मदतीचा ओघ सुरूच राहील असे आश्वासन या राजपुत्राने पाकिस्तानला दिले आहे.