हुर्रे… ! NEET ची मुदत एका आठवड्याने वाढली 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाकरीता राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्वाच्या  NEET परीक्षेची मुदत एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवार)  यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश जारी केले. या निर्देशानुसार नीट परीक्षेकरिता आता ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. याचबरोबर २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना  देखील २०१९ ची NEET ची परीक्षा देता येणार आहे. पण त्यांचे अॅडमिशन या प्रकरणाचा अंतिम निकालावर विसंबून राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान ही सर्वोच्च  न्यायालयाच्या या निर्देशामुळे  विद्यार्थ्याना दिलासा मिळणार आहे यात शंका नाही.
‘नीट’ परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना काही  टिप्स –
१. ‘नीट’मधील फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांला मॅथ्समधील वेक्टर्स, डिफरन्शियल अ‍ॅण्ड इन्टग्रल कॅलक्युलस, क्वान्ड्राटिक इक्वेशन्स, प्रोग्रेशन्स अ‍ॅण्ड स्ट्रेट लाइन या पाठांचा अभ्यास उत्तमरीत्या असणे आवश्यक आहे. म्हणजेच ‘नीट’ देणाऱ्या परीक्षार्थीने गणित विषयाचा सविस्तर अभ्यास करायला हवा. ‘नीट’ देणारे विद्यार्थी बरेचदा गणिताचा अभ्यास न करण्याची घोडचूक करतात. ती चूक विद्यार्थ्यांनी टाळायला हवी.
२. फिजिक्स, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी ते समजून घेण्यावर भर द्यावा. केवळ स्मरणशक्ती अथवा फॉम्र्युला सबस्टिटय़ूशन पद्धतीऐवजी संकल्पना समजून घेऊन उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) कौशल्य वापरावे. अशा पद्धतीने अभ्यास केल्यास या विषयामधील प्रश्न सोडवणे परीक्षार्थीला सुलभ जाईल.
३. अनेक विद्यार्थी ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील रिअ‍ॅक्शन्स या नुसत्या पाठ करतात. मात्र ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांने सुरुवातीला रिअ‍ॅक्शन मेकॅनिझम इन ऑरगॅनिक केमिस्ट्रीची तत्त्वे आणि इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमधील बॉण्डिंग, रिडॉक्स आणि पिरिऑडिक टेबल ही तत्त्वे पूर्णत: समजून घ्यावीत आणि त्यात पारंगत व्हावे. त्यामुळे केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पाठांतराची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही.
४. ‘नीट’च्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी अरिहंत, दिशा, टाटा मॅक्ग्रॉ हिल्स, एमटीजी, सेन्गेज, पीअरसन्स आदी राष्ट्रीय पातळीवरील प्रकाशकांच्या पुस्तकांचा उपयोग करावा. राष्ट्रीय परीक्षांसाठी शिकवणीसाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. जे शिक्षक राज्य पातळीवर परीक्षांपुरतेच शिकवतात, त्यांना ‘नीट’ परीक्षेच्या अभ्यासक्रमातील अनेक धडे शिकवता येणे शक्य असेलच, असे नाही.
५. बायोलॉजी हा माहिती देणारा विषय असून त्याच्या योग्य नोट्स काढणे आणि या विषयाचा वारंवार अभ्यास करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे हा विषय चांगलाच लक्षात राहतो. त्याच वेळेस बायोलॉजी या विषयातील अनेक संकल्पनांचे पाठांतर करण्याऐवजी त्या सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक ठरते. ह्य़ुमन जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोमेडिकल इन्स्ट्रमेन्टेशन, अ‍ॅनाटोमी ऑफ कॉर्डेट्स अ‍ॅण्ड नॉन कॉर्डेट्स, बायोटेक्नोलॉजी आणि मॉलीक्युलर बायोलॉजी या विषयांकडे सर्वसाधारणपणे सर्वाधिक विद्यार्थी दुर्लक्ष करणे पसंत करतात. मात्र हे विषय महत्त्वाचे आहेत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयांचा सविस्तर अभ्यास करावा.
६. ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांला बायोलॉजी या विषयाच्या अनेक संकल्पना उत्तमरीत्या माहीत असणे अत्यावश्यक आहे. फिजिक्समधल्या थर्मोडायनॅमिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नॅटिक्स तसेच केमिस्ट्रीतील आयोनिक इक्विलिब्रिया, ऑरगॅनिक केमिस्ट्री आणि बायोमॉलिक्यूल्स या धडय़ांचा बायोलॉजीच्या अनेक संकल्पना समजून घेण्यास उपयोग होतो.
७. ‘नीट’ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांच्या अभ्यासासाठी ‘एनसीईआरटी’च्या पाठय़पुस्तकांचा सविस्तर अभ्यास करायला हवा.
८. ‘नीट’ परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेत परीक्षेपूर्वी तीन महिने अनेक चाचणीपरीक्षा दिल्या तर विद्यार्थ्यांना परीक्षेचा चांगलाच सराव होईल आणि ‘नीट’मध्ये विचारल्या गेलेल्या अमुक एका प्रश्नाचे उत्तर आपण लिहू शकतो का, याचाही अंदाज विद्यार्थ्यांना येऊ शकेल. ही निर्णयक्षमता विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी चाचणी परीक्षांमधील आपल्या कामगिरीचे सातत्याने विश्लेषण करणे आवश्यक ठरते.
वर नमूद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या तर वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा देणे आणि त्यातील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावणे सहजशक्य ठरेल.
NEET साठी अशी केली जाते कौन्सिलिंग
कौन्सिलिंगसाठी पात्र उमेदवारांना वेगळी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना तुम्हाला त्यात अभ्यासक्रमाची निवड, महाविद्यालयांची प्राधान्यक्रमाने निवड करून तुम्हाला तुमची आवड निश्‍चित (लॉक) करावी लागते. त्यामुळे ही प्रक्रिया करण्याच्या आधी मिळालेले गुण, अभ्यासक्रम आणि महाविद्यालयाची निवड यांचा नीट अभ्यास करावा. कारण एकदा ऑनलाइन भरलेला अर्ज अंतिमतः निश्‍चित केल्यावर (लॉक केल्यावर) त्यात बदल करता येत नाही. त्यानंतर जागांची अलॉटमेंट प्रक्रिया तुमचे गुण आणि रॅंक यांवर आधारित केली जाते. कौन्सिलिंगनंतर तुम्हाला निश्‍चित केलेल्या महाविद्यालयास विद्यार्थ्याने विदीत कालावधीत रिपोर्ट करायचा असतो. प्रवेश घेताना उमेदवाराजवळ कागदपत्रांच्या मूळ प्रती (स्वसाक्षांकित) व्हेरिफिकेशनसाठीसोबत असायला हव्यात.