संसद भवन परिसरात चुकीच्या दारातून आली ‘ती’ गाडी आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात चुकीच्या दरवाज्यातून एका गाडीने आत येण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे सुरक्षारक्षकांची धावपळ झाली. परंतु ही गाडी कोणाची आहे हे स्पष्ट होताच सुरक्षारक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु घडल्या प्रकाराने काही काळ मात्र सुरक्षारक्षक गांगरून गेल्याचे दिसून आले. समोर आलेल्या माहितीनुसार, संसदेत चुकीच्या दरवाज्यातून आत येण्याचा प्रयत्न करणारी कार ही काँग्रेसचे मणिपूरमधील खासदार डाॅ. थोकचोम मेनिया यांची होती.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यामुळे संसद भवन परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आहे. परंतु संसद भवनातील गाड्या बाहेर जाण्यासाठी असलेल्या एका दारातून एक गाडी आत येण्याचा प्रयत्न करत होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षारक्षक गांगरून गेले. त्यांनी लगेचच सतर्कता ठेवत पळापळ करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. कारण या गाडीत कोण आहे हे मात्र स्पष्ट नव्हते. शिवाय गाडीवर संसद सदस्य असल्याचे स्टिकर होते. थोडी चौकशी केल्यानंतर ही गाडी संसद सदस्याची असल्याची खात्री झाली. या गाडीचा क्रमांक डीएल 12 सीएच 4897 असा होता. मंगळवारी हा प्रकार घडला.

या गाडीने चुकीच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर मात्र संसद भवन परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. शिवाय ही गाडी बाहेर जाण्याच्या दारातून आत आली तर सुरक्षाव्यवस्थेत नक्की कुठे कमी आहे याचा तपासही केला जात आहे असे समजत आहे.

दरम्यान 13 डिसेंबर 2001 रोजी लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात 9 सुरक्षारक्षकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आज घडलेल्या घटनेने काही वेळासाठी का होईना त्या घटनेची कटू आठवण जागी केली होती.