सेन्सेक्स वर निकालांचा परिणाम ? पुन्हा मोठी घसरण … 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थान, मध्यप्रदेश छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये मतदान  पार पडले या पाच राज्यांच्या निकालावर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची आघाडी आहे तर मध्यप्रदेश मध्ये भाजप आणि काँग्रेस मध्ये चुरस सुरु आहे. तेलंगणा मध्ये टीआरएस आघाडीवर आहे. तर मिझोराम मध्ये स्थानिक पक्षाची आघाडी आहे. मात्र निवडणुकांचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला आहे. त्यातच आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचा हा परिणाम आहे असे देखील तज्ञांकडून  सांगण्यात येत आहे. आज सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ३०० अंकांनी कोसळला असून त्यात आणखी घसरण होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचा परिणाम ?
आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल तडकाफडकी राजीनामा दिला. तेव्हाच शेअर मार्केट गडगडण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्याप्रमाणे राजीनाम्याची बातमी येताच शेअर मार्केट गडगडायला सुरुवात झाली. आधीच अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमुळे शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याचं चित्र होतं. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपचा पराभव झाल्यास शेअर मार्केट गडगडेल असं अनेक तज्ज्ञ म्हणत होते. दरम्यान पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची सरशी होत असल्याचे प्राथमिक कल येताच सेन्सेक्सची घसरण सुरू झाली आहे.
शेअर मार्केटमधील उतार -चढाव हे आरबीआयच्या धोरणांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या कलांवर अवलंबून असतात. आरबीआयचे नवीन संचालक येईपर्यंत शेअर मार्केटमधील मंदी आणि अस्थिरतेचे वातावरण कायम राहील असं अनेक मार्केट अनॅलिस्ट्सचं म्हणणं आहे. मध्यप्रदेश ,राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरामच्या निकालांचाही मार्केटवर दुरगामी परिणाम होऊ शकतो.
भाजपाच्या यश-अपयशाचा मार्केटवर परिणाम 
विशेष म्हणजे शुक्रवारी शेअर बाजाराने दिवसभर चांगली कामगिरी केली होती. शुक्रवारी सेन्सेक्स ३६१ अंकांच्या तेजीसह ३५,६७३ वर तर निफ्टी ९२ अंकाच्या तेजीसह १०,६९३ वर बंद झाला होता. मतदानानंतर आलेल्या या विधानसभा निवडणुकीत  भाजपला अपेक्षित यश मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्याचा परिणाम शेअर मार्केटवरीह झाल्याचं सांगण्यात येतं.