दुधाची पिशवी आणायला जाणे पडले सात लाखांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरातील महिला दूध आणण्यासाठी बाहेर गेल्याचा डाव साधत चोरट्याने घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून ७ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी गोखलेनगर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा बोराडे (५०, गोखलेनगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या गोखले नगर येथे गोपाळ कृष्ण विकास महामंडळाजवळ राहण्यास आहेत. त्या बुधवारी सकाळी घरी असताना दूध आणण्यासाठी घराचा दरवाजा पुढे करून गेल्या. त्यावेळी कुणीतरी चोरट्याने घरात प्रवेश करत हॉलमधील ड्रावरमध्ये ठेवलेली २ लाख २६ हजार १५० रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ७ लाख ०६ हजार १५० रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड करत आहेत.