सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे आहे असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. घटनेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्के आहे. याआधी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये आरक्षणाचे प्रयोग करण्यात आले होते. पण, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे हे आरक्षण तरी न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केले.

केंद्र सरकारने सवर्ण जातींना १० टक्के आरक्षण दिेलेले आरक्षण न्यायालयात टिकण्याबाबत शंका व्यक्त करून पवार म्हणाले, हे आरक्षण कुणासाठी हा प्रश्न आहे. याचा लाभ शहरातील काही सुशिक्षीत कुटुंबातील मुलांनाचा होईल. खेड्यातील मुले मात्र या स्पर्धेत मागे पडतील. आरक्षणाचा निर्णय आत्ताच का घेतला गेला असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.

पवार म्हणाले, की निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय ते म्हणाले.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात ज्याची जास्त ताकद त्या पक्षाला जास्त जागा असे सूत्र असायला हवे. त्यानुसार जागावाटप व्हायला हवे. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंबंबधी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. देश पातळीवर आम्ही एकत्र येण्याचा विचार नाही. पण, राज्य पातळीवर एकत्र निवडणूक लढवू असेही पवार म्हणाले.