राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर ; माढ्यातून शरद पवार यांची उमेदवारी निश्चितच ?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघण्याची संभाव्य तारीख जवळ आल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीने लगबग सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. त्याच प्रमाणे शरद पवार यांची माढ्यातून लढण्याचे जवळपास ठरलेच आहे आता फक्त त्या संदर्भात अधिकृत घोषणा करण्याचे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ठाण्यातून गणेश नाईक यांना उभा करून शिवसेनेला आव्हान उभे करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याचे समजते आहे. तर तिकडे बारामती आणि साताऱ्यात अनुक्रमे सुप्रिया सुळे आणि उदयनराजे भोसले हे विद्यमान खासदार निवडणूक लढवणार आहेत. कोल्हापूर हि विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्याच हातात घड्याळ देण्याचे राष्ट्रवादीने ठरवले असून त्यांना सतेज पाटील मदत करणार का या विषयी कोणीच अंदाज वर्तवू शकत नाही तसेच सतेज पाटलांच्या मदती शिवाय हि जागा राष्ट्रवादी जिंकणे थोडे कठीणच आहे. बीड मधून शेतकरी प्रश्नाचे जाणकार अमरसिंह पंडित तर उस्मानाबाद मधून अर्चना पाटील उमेदवार म्हणून निश्चित झाल्याचे बोलले जाते आहे. शिरूर मधून विलास लांडे कि दिलीप-वळसे पाटील या बाबत निश्चित समजू शकले नाही. तर औरंगाबाद जिंकण्याचा चंग बांधलेल्या राष्ट्रवादीने तेथे सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिले आहेत.

राष्ट्रवादीची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक
आज बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडत असून माढा मतदारसंघातील नाराज नेत्यांना तसेच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना हि या बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीला माढ्याचे आमदार बबन शिंदे, माढ्यातून लोकसभेसाठी इच्छुक असणारे निवृत्त भाप्रसे प्रभाकर देशमुख आदी नेत्यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे. हि बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी पार पडणार असून या बैठकी नंतर शरद पवार यांची माढ्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात येवू शकते अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे.