माढ्याचा तिढा : शरद पवार लढवणार माढ्यातून लोकसभा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (सुरज शेंडगे) – लोकसभा निवडणुकीच्या अधिसूचना निघण्यास अवघ्या काही दिवसांचा अवकाश राहिला असताना आता राजकीय पक्षांत विजयांची समीकरणे जुळवण्याची लगबग सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून  शरद पवार यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सध्या सूत्रांनी सांगितले आहे. २००९ साली स्वतः शरद पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्या वेळी त्यांनी ३,१४,४५९ एवढे  मताधिक्य घेऊन लोकसभा गाठली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ साली लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले मात्र आता माढा मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजी फोफावल्याने खुद्द शरद पवार यांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.

बारामती हॉस्टेलवर पार पडते आहे बैठक

नवी मुंबई,जळगाव आणि माढा मतदारसंघाच्या उमेदवारी निश्चितीसाठी आज बारामती हॉस्टेलवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडते आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, आणि माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे नेते उपस्थित आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांनी सक्रिय राहून या भागासाठी काम केल्याने त्यांना डावलून अथवा त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवून राष्ट्रवादी निर्णय घेऊ इच्छित नाही म्हणून या बैठकीला शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांनाही पाचारण केले आहे.

राष्ट्रवादीतील गटबाजी पवारांच्या उमेदवारीस कारण

माढा मतदारसंघात राष्ट्र्वादीच्या नेत्यांमध्ये सध्या गटबाजीचे राजकारण सुरु आहे. बबन शिंदे , दीपक साळुंखे यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला  विरोध केला आहे. तर साळुंखे यांनी पर्यायी नाव पक्षाने सुचवावे असे देखील मागच्या काळात म्हणले होते. त्यांच्या या मागणीला दुजोरा म्हणून माजी भाप्रसे प्रभाकर देशमुख यांचे नाव पक्षाने पुढे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या नावाला हि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने स्वीकारले नाही. तसेच या सर्व रणधुमाळीत विजयसिंह यांना डावलण्याचा प्रयत्न केला गेल्याने त्यांचे कार्यकर्ते सध्या पक्षावर नाराज आहेत. दोन गटात असलेल्या शीतयुद्धाची परिणीती म्हणून  हा मतदारसंघात राष्ट्रवादीला गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय राजकारणावर दबाव पाठण्याचा प्रयत्न

मागील २५ वर्षांपासून शरद पवार यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत चर्चिले जाते आहे. लोकसभा निकाला नंतर तिसरी आघाडी झाली अथवा काँग्रेसने ऐनवेळी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व देण्याचा विचार केला तर लोकांमधून निवडून आल्याची प्रतिमा राष्ट्रीय पटलावर ठळक पणे दिसावी अशी शरद पवारांची सुप्त इच्छा असून शकते. तर बारामती नंतर राष्ट्रवादीला  सर्वात सेफ असणारा मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघ गणला जातो. या सर्व जमेच्या बाजूमुळे शरद पवार या मतदारसंघात उमेदवारी करू शकतात.

माढा लोकसभा मतदारसंघाला गटबाजीचा इतिहास

माढा लोकसभा मतदारसंघ फेररचनेत अस्तित्वात आलेला मतदारसंघ असून २००९सालच्या लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघात पहिली निवडणूक पार पडली. २००९ च्या निवडणुकीला या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर रणजितसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते मात्र तेव्हा हि त्यांच्या नावाला पक्षातून असाच विरोध झाला होता. तेव्हा विजयसिंहाच्या नावाला हि विरोध करण्यात आला होता. अशा गटबाजीचा तोटा पक्षाला बसू नये म्हणून तेव्हा शरद पवार यांनी स्वतः या मतदारसंघातून उमेदवारी केली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकार्‍यांची लोकसभा निवणुकीच्या पार्श्‍वभुमीवर बैठक पार पडली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या उमेदवारीवरून सोशल मीडियावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीवर स्पष्ट खुलासा दिल्याने शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.