क्राईम स्टोरी

प्रेमभंगातून नगरच्या तरुणीचा शोले’स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमभंगातून नगरमधील तरुणीने लातूर शहरातील इमारतीवर चढून ‘शोले’ स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस व अग्निशमन विभागाच्या जवानांनी तिचा प्रयत्न हाणून पाडला. गुरूवारी रात्री उशिरा तब्बत दोन तास हा थरार सुरू होता.

याबाबत समजलेली माहिती अशी की, लातूर शहरातील औसा रोडवर रेमंड शोरुमच्या शेजारी असलेल्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तळ मजल्यावर वॉचमन वगळता इमारतीत रात्रीचे कोणीही वास्तव्यास राहत नाही.

गुरुवारी (दि. १७) रात्री ९ वाजेच्या सुमारास एक १७ वर्षीय तरुणी हातात दप्तर घेवून अंधारात या इमारतीच्या पायऱ्या चढत गेल्याचे वॉचमनने पाहिले. त्याने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने इमारतीचा चौथा मजला गाठला. या इमारतीच्या मागच्या बाजूला शेवटच्या टोकावर ही तरुणी दोन्ही पाय खाली सोडून बसून रडू लागली.

घटनेची माहिती वॉचमनने मालकास दिली. मालकाने पोलिसांना कळविले. दरम्यान इमारतीच्या शेजारी वास्तव्यास करणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. हजारो लोकांची गर्दी इमारतीभोवती जमा झाली.

पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी इमारतीचे छत गाठले. तोपर्यंत खाली थांबलेल्या पोलिसांनी माईकवरुन तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. तिने काही मोबाईलनंबर पोलिसांना सांगितले आणि त्याला व्हिडीओ कॉल करा आणि मी आत्महत्या करीत असल्याचे सांगा, असा निरोप दिला. हा नंबर तिच्या प्रियकराचा होता.

प्रेमभंगातून आलेल्या नैराश्येतून आपण आत्महत्या करणार असल्याचे ती वारंवार सांगत होती. यावेळी या इमारतीच्या शेजारी शेकडो बघ्यांनी गर्दी केल्यामुळे परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते. पोलिसांसोबतचा संवाद सुरु असतानाच अग्निशमन विभागाच्या जवानांनी या इमारतीच्या खाली जाळीचे अच्छादन तयार केले.

खाली थांबलेल्या पोलिसांनी तिच्यावर टॉर्च लावून तिच्या हालचालींवर नजर ठेवली होती तर काही अधिकारी स्पिकरवरुन तिला बोलण्यात गुंतवून ठेवत होते, इतक्यात अंधारात दबा धरुन बसलेल्या पोलीस उपाधीक्षक सांगळे यांनी तिच्यावर झडप घातली व तिला ताब्यात घेतले.

महिला पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांनी तिला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेले. तिची बाजू ऐकुन घेतली. तेव्हा तिने हा प्रकार प्रेमभंगातून केल्याचे सांगीतले. नगर ज़िल्ह्यातील ही तरुणी मागील आठ महिण्यांपासून शिक्षणासाठी लातुरातील एका हॉस्टेलवर वास्तव्यास आहे. घडलेला हा प्रकार पोलिसांनी तिच्यां पालकांच्या कानावर घातला आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या