अजित पवारांनी माझ्या विरोधात मागे न हटता निवडणूक लढवावीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण मतदारांनी संपन्न असलेला शिरूर हा लोकसभा मतदार संघ आता लोकसभा निवडणुकीसाठी चांगलाच चर्चेत आला आहे. आपण शिरूर मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे असे अजित पवार यांनी केलेले विधान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी चांगलेच उचलून धरले आहे. आता अजित पवार यांनी माघार नघेता माझ्या विरोधात निवडणूक लढूनच दाखवावी असे विधान शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केले आहे. या विधानातून राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांना आढळराव पाटील यांनी सरळ सरळ आव्हानच दिले आहे.

लोकसभा निवडणुकीला अवघा ५० ते ५५ दिवसांचा अवकाश राहिला असून या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाणार हे आता निश्चित असून शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीची अद्याप बोलणी हि सुरु झाली नाहीत. एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या दोन्ही पक्षात सुरु असून युतीची शक्यता फारच कमी आहे. अशातच सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे आढळराव पाटील हे युती झाली तरी उमेदवार राहतील आणि युती झाली नाही तरी उमेदवार राहतील अशी शक्यता आहे. म्हणूनच त्यांनी अजित पवार यांना आत्मविश्वास पूर्वक आव्हान दिले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकला तर आपण शिरूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवू असे अजित पवार यांनी म्हणले होते. त्यावर आढळराव पाटलांनी अजित पवारांनी विधानावरून मागे नहटता माझ्या विरोधात  निवडणूक लढूनच दाखवावी असे आव्हान अजित पवार यांना दिले आहे.

बारामतीच्या पवार घराण्याने नेहमीच माझ्या विरोधात कार्यवाह्या केल्या आहेत. अजित पवार यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवूनच दाखवावी मी हि मराठ्याची अवलाद आहे हे त्यांना दाखवूनच देतो असे म्हणत  शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला कोणीही पराभूत करू शकत नाही अशी पुष्टी आढळराव पाटील यांनी आपल्या विधानाला जोडली आहे.

२००४, २००९ आणि २०१४ या तिन्ही लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या २००४ या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी आढळराव पाटील पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी २००९ साली राष्ट्रवादीचे विलास लांडे या तगड्या उमेदवाराचा पराभव केला होता. तर २०१४ साली देवदत्त निकम यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली होती.