शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्याने दोन्ही राजांच्या मनोमिलनावर पुन्हा शंका

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन –साताऱ्यातील दोन राजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. मात्र हे मनोमिलन होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या संदर्भात सुचक वक्तव्य केलं आहे. रविवारी बदलापूर येथे एका कार्यक्रमात उदयनराजेंनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांना मनोमिलनाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून मला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, असं सूचक वक्तव्य करून शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं. तसंच ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे. अशा लोकांना मी रोखू शकत नाही. त्यांच्या भावनांचा आदर करणं हे माझं काम आहे, असं म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंसोबत मनोमिलन होऊ शकत नाही, याचे संकेतच दिले आहेत.

साताऱ्याच्या दोन्ही राजांचे मनोमिलन व्हावं यासाठी अनेक दिवसांपासून सगळे प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनीही डोकं शांत ठेवण्याचा सल्ला दिला होता. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर देन्ही राजांचे मनोमिलन होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र शिवेंद्रराजेंच्या काही समर्थकांनी थेट शरद पवार यांच्याकडेच उदयनराजेंबद्दल असलेली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आता शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्याने मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे साताऱ्यात दोन्ही राजांच्या मनोमिलनाचे दृष्य दिसणार नाही, अशी भावना व्यक्त होतं आहे.