विरोधकांवरील हल्ले थांबवा अन् पाकिस्तानला ठोकून काढा : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शाहिद झाले. त्यानंतर देशभर या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात असून या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे मत देखील एकच असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा निषेध तर केला आहेच पण पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला आहे. “मोदींना हात जोडून एकच सांगणे आहे, की विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानला ठोकून काढा. हल्ला करणाऱ्यांचा बदल घेण्याची भाषा करा. ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे” असे मत ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामानातून व्यक्त केले आहे.

काश्मीर आमचे आहे असे गेल्या ७० वर्षांपासून घशाच्या शिरा ताणून सांगितले जात आहे. मात्र, तेथेच जवानांच्या हत्या का सुरु आहेत ? असा प्रश्न सेनेने केला आहे. पंडित नेहरुंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली असल्याचे सेनेने म्हटले आहे. ‘पुलवामा’ हल्ल्याने देश हादरला आहे. भारतीय लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकीकडे भाषणबाजी दुसरीकडे भयंकर हल्ला

हा हल्ला अति आणि फाजील आत्मविश्वासावर केलेला असल्याचे म्हणत सेनेने भाजपला लक्ष केले आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. संपूर्ण सरकार भाषणबाजीत, आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहे. उद्याच्या निवडणुकांत कसे व कोणत्या मार्गाने जिंकून पुन्हा दिल्लीत यायचे या ‘पत्तेपिसी’त सगळेच दंग आणि गुंग असताना हा भयंकर हल्ला झाल्याचे सेनेने म्हटले आहे.

पाकिस्तानसारख्या सैतानी राष्ट्रावर हल्ला करा

जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सांगितले आहे. म्हणजे ते नेमके काय व कसे करणार आहेत? असा प्रश्न सेनेने मोदींना केला आहे. जवानांची कुटुंबे निराधार, पोरकी होत आहेत व त्याचे खापर पाकडय़ांवर फोडून आम्ही निवडणुकांच्या रणमैदानात उतरत आहोत. राजकीय विरोधकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यापेक्षा पाकिस्तानसारख्या सैतानी राष्ट्रावर हल्ला करून जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे.

इम्रान खान हे नावाचेच पंतप्रधान

इम्रान खान हे नावाचेच पंतप्रधान असून, आयएसआय व मसूद अजहरसारख्या दहशतवादी संघटनाच ‘पाकिस्तान’ नामक दहशतवादी घडविण्याची ‘कार्यशाळा’ चालवीत आहेत. आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा पाकिस्तान भिकेला लागला असला तरी त्यांच्या भिकेच्या कटोऱयात ‘दान’ टाकणारे चीनसारखे देश असल्याचे म्हणत पाकिस्तानवरही सेनेने निशाणा साधला आहे.