शिवसेनेचे पदच्युत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर शिवसेना पदच्युत तालुकाप्रमुख निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षामध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. लंके हे लवकरच शक्तिप्रदर्शन करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राजयकिय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान लंके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शिवसेनेला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पारनेर शहरात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात निलेश लंके व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याने आता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला संजीवनी मिळणार असल्याचे मानले जात आहे. सुजित झावरे व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे. निलेश लंके यांना शिवसेनेतून काढल्यानंतर लंके यांच्या समर्थकांनी ‘निलेश लोके प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवून शक्ती प्रदर्शन चालू ठेवले होते.
तीर्थक्षेत्र यात्रांच्या माध्यमातून वैष्णवदेवी आणि मोहटादेवी यात्रेत त्यांनी हजारो भाविकांना दर्शन घडवून आणले. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. तरुणांची वेगळी फळी त्यांनी आपलीशी केली. गेल्या काही दिवसांपासून लंके यांनी तालुक्याच्या बाहेर स्थायिक झालेल्या नागरिकांचा शिरुर, पुणे आणि मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विधानसभा निवडणूक लढणार असे निलेश लंके यांनी यापूर्वी अनेकदा दिलेले आहे मात्र झेंड्याचा रंग कोणता हे सांगता येत नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. असे असले तरी दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी चालूच ठेवल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असले तरी स्थानिक राष्ट्रवादीत असणारी गटबाजी काय भूमिका घेते हेही महत्वाचे ठरणार आहे.
झावरे समर्थकांचा विरोध

सुजित झावरे समर्थकांचा लंके याच्या प्रवेशाला विरोध आहे. तर प्रशांत गायकवाड स्वत: उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे मधुकर उचाळे, दिपक पवार, शंकर नगरे, अशोकराव सावंत, बाबासाहेब तरटे हे लंके यांच्या पक्ष प्रवेशासाठी आग्रही आहेत. महानगर बँकेचे अध्यक्ष ऍड. उदयराव शेळके यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, लंके यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा तीन चार दिवसात होणार आहे.