धक्कादायक ! आईची हत्या करुन मांत्रिक मुलाने केले ‘हे’ भीषण कृत्य

रायपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या वडिल आणि भावाच्या मृत्युला आपली आईच जबाबदार असल्याचे तो नेहमी बोलायचा. आई चेटकीण असल्याचे तो सांगत असे. पण नव वर्षाच्या सुरुवातीला त्याने चक्क आपल्या आईची हत्या केली आणि तिच्या शरीरातील रक्त पिले. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात घडली.

ही घटना एका महिलेने पाहिली. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना पाहिल्यानंतर या महिलेला मोठा धक्का बसला. त्यातून ती तीन दिवस सावरु शकली नाही. त्यानंतर तिने हा प्रकार पोलिसांना कळविला. पोलीस शुक्रवारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत दिलीप यादव या मुलाने आपल्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळूनही टाकले होते.

ज्या गावात ही घटना घडली तेथील रहिवाशांनी सांगितले की, मांत्रिक असलेला दिलीप नेहमी माणसाचा बळी देण्याची भाषा करीत असे. तो आपल्या आईचा चेटकीण म्हणून उल्लेख करायचा. तिच्यामुळे आपले वडील व भाऊ मरण पावल्याचाही तो आरोप करीत असे. दिलीपने आईची हत्या करून तिचे रक्त पीत असल्याचे रामकचर गावातील समिरन यादवने पाहिले होते. तिने गुरुवारी रात्री चैतमा पोलीस ठाण्यात याबद्दलची माहिती दिली. सुमारिया या ५० वर्षे वयाच्या व शेजारीच राहत असलेल्या महिलेला भेटायला ती ३१ डिसेंबरच्या सकाळी गेली. तिच्या घरातून समिरनला विचित्र आवाज ऐकू आले. दिलीपने आपली आई सुमारियाच्या मान, डोके व छातीवर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार मारले. त्यानंतर तिच्या जखमेतून वाहणारे रक्त तो प्यायला लागला.

हे दृश्य पाहून समिरनची बोबडीच वळली व थरथरू लागली. तिने कसाबसा तिथून काढता पाय घेतला व आपल्या घरी गेली. ही घटना कोणालाही सांगायची तिची हिंमत झाली नाही. दोन-तीन दिवसांनंतर तिने ही घटना आपल्या सासऱ्यांना सांगितली. सरपंचाबरोबर चर्चा केल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. दिलीपच्या घरी पोलिसांनी जाऊन सुमारियाच्या मृतदेहाची राख, जळालेली हाडे जप्त केली. सध्या फरारी असलेल्या दिलीपने आणखी कोणाला इजा करण्याच्या आधीच त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात पोलीस करत आहेत.