लवकरच नेहमीच्या वापरातील ‘या’ औषधांवर सरकार घालणार बंदी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता ८० जेनरिक एफडीसी औषधांना प्रतिबंधित करण्याचे ठरवले असून, त्यामुळे अनेक आजारांवरील औषधांच्या विक्रीवर बंदी येणार आहे.
पोटात दुखणे, ओकारी, रक्तदाब, सांधेदुखी, ताप, सर्दी अशा आजारांवर असलेल्या अनेक अँटिबायोटिक औषधांवर बंदी घातली जाणार आहे. एकापेक्षा अधिक औषधांच्या मिश्रणातून तयार केलेल्या सुमारे ३०० जेनरिक औषधांची यादी प्रतिबंधित केली गेली असून, आता पुन्हा आरोग्य मंत्रालय नव्याने कारवाई करण्याच्या पावित्र्यामध्ये आहे. या नव्या औषधांचे उत्पादन करणाऱ्या बड्या कंपन्यांच्या औषधांवरही बंदी येण्याची शक्यता आहे.

राममंदिर संकल्प रॅली शुभारंभ : धार्मिक व्यासपीठावर ‘डॉन’ला पाहून सारेच आवाक
नागपूर : अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यात यावे, या मागणीसाठी वीर बजरंगी सेवा संस्थानच्यावतीने संकल्प यात्रा (बाइक रॅली) काढण्यात आली. या रॅलीच्या उद्घाटनासाठी सुदर्शन चौक येथे उभारण्यात आलेल्या मंचावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून ‘नागपूरचा डॉन’ म्हणून ओळखला जाणारा संतोष आंबेकर बसल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

वीर बजरंगी सेवा संस्थानच्या वतीने रविवारी राममंदिर निर्माण करण्यात यावे, या मागणीसाठी सुदर्शन चौक येथून वर्धमाननगर ते रामटेक अशा ७० किलोमीटरच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून ही रॅली काढण्यात येत आहे. आजच्या या रॅलीत विविध हिंदू संघटनांचे पाच हजारांवर कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी मंचावर शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेतील नेते आ. दुनेश्वर पेठे आदी उपस्थित होते.

मंचावरील सर्व नेत्यांच्या गर्दीत संतोष आंबेकरचा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. नागपूरच्या गुन्हेगारी जगतात संतोष आंबेकरची एक डॉन म्हणून ओळख आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी कळमना, अंबाझरी, लकडगंज, कोतवाली, सदर, सीताबर्डी, तहसील पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु यातून त्याची न्यायालयाने सुटका केली आहे.