कपडे घेताय ? जरा थांबा आता येणार चांदीचे कपडे

बीजिंग : वृत्तसंस्था – तंत्रज्ञानात होणारी प्रगती ही दिवसेंदिवस वाढत आहे. कधी काय शोध लागेल हे काही सांगता येत नाही. आता या विकसित तंत्रज्ञानामुळे फक्त उपकरणेच नाही तर आता कपडेही स्मार्ट होताना दिसत आहे. संशोधकांनी आता असे कपडे बनवण्याचे तंत्र शोधले आहे जे केवळ आरामदायक व आकर्षकच नसतील तर त्याच्या सहाय्याने परिधान करता येणारे उपकरणही संचालित होऊ शकेल. त्यांनी यासाठी चांदीच्या अतिशय पातळ व लवचिक धाग्यांची निर्मिती केली आहे. त्यापासून हे अद्ययावत कपडे बनवले जाणार आहेत.

हा मार्ग नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ पोस्टस् अँड टेलिकम्युनिकेशन्स इन चायनाच्या संशोधकांनी शोधला असल्याचे समजत आहे. तुम्हाला माहीत नसेल परंतु जगाला रेशमाची ओळख प्रथम चीनने करून दिली होती, असे मानले जाते. आता प्राचीन काळातील रेशमी कपड्यांच्या निर्मितीनंतर पुन्हा एकदा चीननेच आधुनिक काळातील हे चांदीचे कपडेही निर्माण करण्याचे तंत्र शोधले आहे. त्यामुळे या चांदीच्या कपड्याचा मानही चीनचा आहे.

कसे असेल हे तंत्र ?

हे तंत्र अतिशय साधे व किफायतशीर आहे. यासाठी त्यांनी आधी कापूस, नायलॉन आणि पॉलिस्टरच्या धाग्यांना चांदीच्या नॅनोवायरच्या पदार्थात सोडले. त्यानंतर चांदीच्या नॅनोवायरना बाष्पीकरण व अन्य प्रक्रियांमधून काढले व ते उत्तम वाहक असलेले कपडे बनतील अशी रचना केली. त्यांच्या प्रयोगशाळेत चाचण्या केल्यावर त्या अतिशय यशस्वी ठरल्या. हे फायबर लवचिक आणि आरामदायक आहे. तसेच यामधील प्रवाहकताही उत्तम असून कापड मजबूतही आहे.