‘या’ कंपनीने तयार केले स्मार्ट शूज

मुंबई : वृत्तसंस्था- स्मार्टफोननंतर आता बूटही स्मार्ट झाल्याचं समजत आहे. या बूटाची खासियत सांगितली तर डोळे मोठे झाल्यावाचून राहणार नाही. तुमच्या पायांचा आकार कसाही असला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही असे हे बूट आहेत. हे बूट पायात घालताच ते तुमच्या पायाच्या आकारानुसार आकार बदलतात. वाचून चकित झालात ना? होय पण हे खरं आहे. या बुटांमध्ये यासाठी खास सेंसर आहे. क्रीडा क्षेत्रातील साहित्य बनवणारी दिग्गज कंपनी Nike ने स्मार्ट बूट लाँच केले आहेत. पायांचा आकार कसाही असला तरी हे बूट पायात अगदी फिट बसणार अशी माहिती समोर आली आहे.

आणखी एक विशेष बाब म्हणजे एका मोबाइल अॅपद्वारे हे बूट कार्यरत असणार आहेत. Nike Adapt BB असं या बुटांचं नाव आहे. आता हे बूट लाँच करुन  Nike कंपनीने बुटांच्या जगतात डिजीटल युगाची सुरूवात केली असल्याचं म्हटलं जात आहे. विशेषतः खेळाडूंच्या मागणीनुसार या बुटांची निर्मिती केली असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

याबाबत बोलताना कंपनीने सांगितले की, “पायाला योग्य फिटींग आणि वारंवार लेस बांधण्याची कटकट नसावी अशा प्रकारची मागणी खेळाडूंकडून केली जात होती. तीच त्यांची सर्वात मोठी अडचण होती, म्हणून हे बूट आणले आहेत.”

या बूटांना कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एका स्मार्टफोनचा सहारा घ्यावा लागणार आहे. कारण एका मोबाईल अॅपवर याचा कंट्रोल असणार आहे असे समजत आहे. जर तुम्ही बूट ऑटोमॅटिक फिटिंग मोडवर केले तर  सेंसरमुळे पायाच्या आकारानुसार आपोआप ते फिट होतील. जर बूट फिट किंवा सैल झाले तर अॅपच्या मदतीने तुम्ही त्यात योग्य तो बदल करू शकता हे विशेष.

17 फेब्रुवारी 2019 पासून या बुटांची विक्री सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार 350 अमेरिकी डॉलर इतकी या बुटांची किंमत आहे. म्हणजे भारतात जवळपास 25 हजार रुपयांच्या दरम्यान या बुटांची किंमत असेल अशी शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.