कोरेगाव-भीमा, शनिवारवाडा येथे सभा घेतल्यास गाठ आमच्याशी : दिलीप कांबळे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव-भीमा येथे यंदा विजयस्तंभ परिसरात कुणालाही सभा घेऊ दिली जाणार नाही, तसेच कायद्यापुढे कोणीही मोठा नसल्याने शनिवार वाड्यावर प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी दिला आहे. कारवाईचा इशारा देतानाच कांबळे यांनी शनिवार वाड्यावर सभा घेतल्यास गाठ सरकारशी आहे, असे म्हटले आहे.

माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचा जबाब पोलिसांनी नोंदवल्यानंतर येत असलेल्या प्रतिक्रियांच्या पाश्र्वभूमीवर कांबळे बोलत होते. ते म्हणाले, पी.बी. सावंत आणि प्रकाश आंबेडकर कायद्यापेक्षा मोठे नाहीत. यावर्षी कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभाजवळ सभेस परवानगी दिली जाणार नाही. तसेच शनिवार वाड्यावर कोणी सभा घेण्याचा प्रयत्न केल्यास गाठ सरकारशी असेल, असा सज्जड दमही त्यांनी कांबळे यांनी भरला.

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे झाली, काही लोकांना विजयस्तंभावर अघटित घडवण्यासाठी पाठवण्यात येणार होते, मात्र प्रशासन आणि शासनाला याची माहिती मिळाल्याने हा डाव साध्य झाला नाही. त्यामुळे सरकार यावर्षी सर्व काळजी घेत असून एक जानेवारीला विजयस्तंभावर केवळ अभिवादन करण्यास जाता येईल. सभेसाठी दुसऱ्या स्वतंत्र ठिकाणी जागा देण्यात येईल, असे कांबळे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणि नक्षली कनेक्शन या संदर्भात बोलताना दिलीप कांबळे यांनी हा विषय न्यायालयात असल्याने जास्त बोलता येणार नाही, असे सांगतानाच या अनुषंगाने सूचक वक्तव्य केले.