भाजपची सत्ता असणाऱ्या ‘या’ शहराच्या पालिकेत राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन- लोकशाहीत कधी काय होईल हे सांगता येत नसते. याच विधानाचा परिचय सोलापूरच्या महानगर पालिकेच्या सभागृहात आला आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपची सत्ता पाय उतार करत काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केले असताना आता सोलापूर  पालिकेत हि राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करून घेण्यात आला आहे.

राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, तौफीक हत्तुरे, अनुराधा काटकर, फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, प्रवीण निकाळजे, प्रिया माने, वैष्णवी करगुळे यांनी हा प्रस्ताव दिला होता. “राहुल गांधी यांच्या कुशल नेतृत्वात  छत्तीसगड ,राजस्थान , मध्य प्रदेश या राज्यात काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्या विजयाचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीला हि होणार आहे. तर या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून त्यांच्यात पुढील निवडणुकी साठी उत्साह संचारला आहे. त्याच प्रमाणे या विजयाचे सर्व श्रेय हे राहुल गांधी यांच्या कुशल नेतृत्वाला जात असल्याने हि सभा राहुल गांधी यांचे अभिनंदन करते आहे.” अशा आशयाचा हा अभिनंदन प्रस्ताव बनवण्यात आला होता.

भाजपची सत्ता असताना हा ठराव बहुमताने मंजूर कसा झाला असा सवाल सर्वांना पडला असून भाजपचे नगरसेवक बहुसंख्येने गैर हजर असल्याने हा सर्व प्रकार घडला असावा असा अंदाज लावला जातो आहे. या संदर्भातील अधिक माहिती स्पष्ट होऊ शकली नाही. परंतु सोलापूरची पालिका दोन देशमुखांच्या गटबाजीच्या राजकारणाने गाजत असताना राहुल गांधी यांच्या अभिनंदन ठरावाने हि गाजू लागली आहे.