सोलापूरात जि.प. उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोळा (ता. सांगोला) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिविहार आणि चित्रफितीत स्मारक उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडासह शासनाकडून निधी उपलब्ध करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. कोळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी कोळा येथे अस्थिविहार आणि स्मारक उभारण्याचा ठराव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिल्याने हा विषय मंजूर करण्यात आला. कोळा येथील बौध्द समाज मंदिर हे १९४४ साली लोकवर्गणीतून माती बांधकामात बांधण्यात आले होते. ते सध्या जीर्ण झाले आहे. दि. ६ डिसेंबर १९५६ साली महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांचे निकटवर्तीय सहकारी व कोळे गावचे सुपूत्र स्व. महिपतराव मोहन मोरे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी या कोळा गावी आणून आ.डी. भंडारे यांच्या हस्ते दर्शनासाठी बौध्द विहारात ठेवला होता.

कोळा हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, सांगोला तालुक्यामध्ये बौध्द समाज मोठ्या प्रमाणात आहे. सन २००९ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या ३८ हजार ६६९ इतकी होती. याचाच अर्थ आजमितीला सन २०१८ ला ती लोकसंख्या ५० ते ६० हजारावर पोहचली आहे. कोळा जिल्हा परिषद गटांमध्ये पाचेगाव बु, किडेबिसरी, तिप्पेहाळी, जुनोनी, हटकर, मंगेवाडी, जुजापूर, गुणाप्पावाडी, हातीद, गौडवाडी या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी अस्थि विहार बांधल्यास डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी आणि बहुजन समाजाला या दैवताचे दर्शन घेणे सोईचे होईल, असा ठराव ॲड. देशमुख यांनी मांडला होता.