‘त्या’ नंतर घडलं असं काही कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार थोडक्यात वाचले

पिंपरी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पिंपरी-चिंचवड शहरात असताना. त्यांची पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकर पुतळ्याच्या मागे असलेल्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस हे लिफ्टने खाली येत असताना. लिफ्ट मध्ये अचानक बिघाड झाला आणि एकच ओरडा सुरू झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाच काहीही झालेलं नाही.

सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यामागे एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होती. जवळपास एका तासानंतर पत्रकार परिषद संपली, काही कार्यकर्ते आणि पोलीस, पत्रकार हे लिफ्ट मधून खाली येत होते. त्याच दरम्यान लिफ्ट अर्ध्यात अडकली, यामुळे काही मिनिटं आतमध्ये सर्वजण अडकले.

हॉटेल प्रशासनाने प्रयत्न सुरू केले पण लिफ्ट दुरुस्त होत नव्हती. अखेर अचानक लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जोरात आदळली. या घटनेमुळे पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि कार्यकर्ते घाबरले होते. अचानक झालेल्या प्रकारामुळे सर्वजण गोंधळून गेले. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी नसून सर्वजण सुखरूप आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे काही मिनीट अगोदर याच लिफ्टमधून खाली आले होते.