धक्कादायक…!चित्रपटाच्या तिकिटासाठी चक्कं वडिलांना जाळले 

तामिळनाडू : वृत्तसंस्था – तामिळनाडूतील वेल्लोर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गवंडी काम करणाऱ्या एका तरुणाने चित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चक्क वडिलांना पेटवल्याची माहिती उघडकीस आली आहे. अजिथ कुमार असे या तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्याचे वडिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी  की, पांडियन (४५) हे वेल्लोरमध्ये एक मुजरीचे काम करतात. पत्नीशी भांडण झाल्यामुळे काही दिवसांपासून ते घराबाहेर रस्त्याच्या कडेला राहत होते. गुरुवारी सकाळी ते पहुडले असताना त्यांचा मुलगा अजिथ कुमार याने येऊन त्यांना उठवले. ‘विश्वासम’ या चित्रपटाला जायचे असून तिकिटासाठी मला पैसे द्या, अशी मागणी त्यानं केली. तेव्हा पांडियन यांनी त्याला सरळ नकार दिला.
 संतापलेला अजिथ काही वेळानंतर घरातून रॉकेलची बाटली घेऊन आला. त्यानं मागचा पुढचा विचार न करता वडिलांच्या चेहऱ्यावर आणि हातावर रॉकेल ओतले आणि आग लावून पोबारा केला. पांडियन यांची किंकाळी ऐकून आजूबाजूच्या मजुरांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. आग आटोक्यात आणत लगेच त्यांनी पांडियन यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पांडियन यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. अजिथ कुमार हा वेल्लोरमध्येच एका बांधकाम व्यावसायिकाकडं गवंडीकाम करतो. अल्पवयीन असल्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली नाही.