भाजपा नेत्यांसाठी वेड्यांचे मोफत रुग्णालय सुरु करा – धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीने चांगलाच हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून पूनम महाजन यांनी केलेली टीका निषेधार्थ आहे. भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता वेड्यांचे मोफत रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगम जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असे संबोधून शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून बुधवारी धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन भाजपावर निशाणा साधला.

धनंजय मुंडे –

भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता वेड्यांचे मोफत रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे.
महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही. पवार साहेबांवर टीका करणारे राजकीयदृष्ट्या संपून गेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे’ असे मुंडे यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड –
पवार महाजन हे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळे पूनम महाजन यांनी त्यांच्याबद्दल बोलताना विचार करायला हवा होता. आम्हाला आमची पातळी सोडायला वेळ लागणार नाही. अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाडांनी घेतली होती. दरम्यान प्रवीण ने प्रमोद को क्यू मारा अशे पोस्टर काल मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले.

रोहित पवार –
यावर शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकहुन आपले मत मांडले आहे. राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी आजपर्यंत महिलांबाबत बेताल वक्तव्ये केली. तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी बांधून होत्या, आता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहिले ते तुम्हीच सांगा, असा सवाल करत रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. त्यावर त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या तीन भाजप नेत्याच्या नावांचा उल्लेखही केला आहे. रोहित पवार यांच्या प्रत्युत्तरावर सोशल मीडियावर चर्चाही होत आहे.