MBBS च्या विद्यार्थ्याची राहत्या घरी आत्महत्या

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन – लोणी काळभोर, उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अनिकेत संजय धुमाळ (वय -२२ ) रा. उरुळी कांचन या विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. २२ ) पहाटेच्या सुमारास घडली. अभ्यासाच्या तणावातून अनिकेतने आत्महत्या केल्याचा दावा अनिकेतच्या नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी अनिकेतचे वडील संजय दत्तात्रय धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली. यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी अनिकेतच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून घोषित केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील डॉ. अर्चना धुमाळ या परिसरात नामांकित डॉक्टर आहेत. त्यांचा स्वत:चा सुयश नर्सिंग होम या नावाने महात्मा गांधी रस्त्यावर दवाखाना आहे. त्यांना अनिकेत आणि सुयश अशी दोन मुले आहेत. त्यातील अनिकेत हा पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास अनिकेतसह सर्वजन आपआपल्या खोलीत झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अनिकेतचे वडील संजय धुमाळ यांनी अभ्यासासाठी झोपेतून उठवले. यावर अनिकेतने वडिलांना सांगितले कि, तुम्ही झोपा मी माझा अभ्यास सुरु करतो. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अनिकेत अभ्यास करतो कि नाही, हे पाहण्यासाठी अनिकेतच्या खोलीचा दरवाजा वाजविला असता, आतून कसलाही प्रतिसाद न आल्याने संजय व त्यांची पत्नी डॉ. अर्चना धुमाळ यांनी दरवाजाला जोराने धक्का देऊन दरवाजा उघडला. दोघेही आत शिरले असता, अनिकेतचा मृत्यूदेह खोलीतील पंख्याला लटकलेला आढळून आला. अनिकेतने शालच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घडलेल्या घटनेची माहिती संजय धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली.