2019 नाही पण निदान 2024 मध्ये तरी आमचा विचार करा : प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात नवोदीत तरुणांना संधी कमीच देण्यात येते. त्यावरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ज्येष्ठ नेत्यांना सल्ला दिला आहे. राजकारणात बाप योग्य ठिकाणी थांबला तर पोरं पुढे जातील, 2019 नाही पण निदान 2024 मध्ये तरी आमचा विचार करा, असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत एका व्यक्तीला दोनवेळाच निवडणूक लढवता येते, आपल्याकडे असे नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. युवक काँग्रेसच्या वतीने राज्यात युवक क्रांती यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात सत्यजीत तांबेनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच आपली इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या भूमिकेचे युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले, पण तांबे यांनी दिलेला हा सल्ला पक्षातील ज्येष्ठांना मात्र फारसा रूचला नाही. कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी युवक कॉंग्रेस काय करणार हे सांगावे, असा सवाल केला.

हाच धागा पकडत युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, की सत्तार काका तुमच्या सारखा बाप प्रत्येक, युवक कार्यकर्त्याला लाभला पाहिजे. जो आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन करतो. आज आमच्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. खरं तर प्रसार माध्यमांनी याची दखल घ्यायला हवी की ज्येष्ठ आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी समोर खाली बसले आहेत. तर सगळे तरुण पदाधिकारी, कार्यकर्ते व्यासपीठावर आहेत.

राजकारणात जर प्रत्येक बाप योग्य ठिकाणी थांबला तरच त्याच्या पोराला पुढे जाता येत. म्हणूनच अमेरिकेत एका व्यक्तीला फक्त दोनदा निवडणूक लढवता येते, आपल्याकडे मात्र तसे नाही. आम्हाला 2019 मध्ये नाही पण किमान 2024 मध्ये तरी संधी द्या, असा टोला सत्यजीत तांबे यांनी लगावला. 2019 मध्ये देशात आणि राज्यात कॉंग्रेसची सत्ता आणण्यात युवक कॉंग्रेसचा सिंहाचा वाटा असले, पण सत्ते आम्हाला खारीचा वाटा तरी द्या, असा चिमटा देखील त्यांनी काढला.

दरम्यान, सत्यजीत तांबेंनी केलेल्या प्रत्येक मागणीवर आणि इच्छेवर युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली. परंतू तेथील उपस्थित ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मात्र भुवया उंचावल्या होत्या. त्यावरून त्यांना तांबेंच्या मागण्या रुचल्या नाहीत हेच स्पष्ट होत होते.