खुशखबर ! घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत होणार घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जनतेला सुखद धक्का दिला असून घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत आता घट करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत १.४६ रुपयांनी घट होणार आहे. तर विना अनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दिल्लीत त्यामुळे आता अनुदानित सिलेंडर ४९३.५३ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर प्रत्येक राज्याचे सुधारित दर हे लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. हि दरातील घट आज गुरुवारी मध्यरात्री पासून लागू करण्यात येणार आहे.

एलपीजी सिलेंडरच्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने कपात होत आहे. १ डिसेंबरला अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ५.९१ रुपयांनी कमी झाली होती. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत १२०.५० रुपयांनी घटली होती.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार नवनवीन खुशखबरी जनतेला देऊ लागले आहे. येत्या काळात सिलेंडरच्या दारात आणखी कपात झाली तर नवल बाळगण्यासारखे काहीच नसणार आहे. त्याच प्रमाणे सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून हि जनतेला सुखद धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.