सोनाली बेंद्रेनंतर ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने कॅन्सरमुळे कापले केस 

मुंबई : वृत्तसंस्था – सोनाली बेंद्रेने आपले डोक्‍याचे संपूर्ण केस कापले होते आणि सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केला होता. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिनेदेखील डोक्यावरचे केस काढले आहेत. आणि याचा फोटोदेखील इन्स्टाग्रामवर टाकला आहे. यापूर्वी ताहिराने ब्रेस्ट कॅन्‍सर झाल्‍याची माहिती  सोशल मीडियाच्‍या माध्‍यामातून दिली होती. यानंतर पुन्हा एक फोटो तिने पोस्ट केला आहे.

शेवटच्‍या कीमोथेरिपी प्रोसेसच्‍या आधी ताहिराने काही व्‍हिडिओज शेअर केले होते. मोठ्या धिटाईने ताहिरा कॅन्सरशी लढा देत आहे. आता ताहिराने डोक्यावरचे केस कापलेला फोटो टाकत आपल्या भावना व्यक्त केल्याचे दिसत आहे. सदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ताहिराने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “हॅलो, ही मी आहे. जुन्‍या लुकला मी कंटाळले होते. हा कसा लूक आहे. मी विचारदेखील केला नव्‍हता, की मी बाल्ड होईन. मला आता चांगले वाटत आहे.”

ताहिराने पोस्‍टमध्‍ये म्‍हटले होते की, “कॅन्‍सरची सुरूवात झाली आहे. माझ्‍या उजव्‍या ब्रेस्टमध्‍ये डीसीआयएस आहे. ही कॅन्‍सरच्‍या आधीची पहिली स्टेज होती आणि ते एकाच ब्रेस्टमध्‍ये होतं. कॅन्‍सरची सुरूवात झाल्‍याने लवकरात लवकर उपचार करून निदान करण्‍यासाठी ताहिरावर मॅस्टेक्टमी (स्तन काढण्‍याची की प्रक्रिया) करण्‍यात आली आहे.”

ताहिराने लिहिले होते, “मी ३५ वर्षांची आहे आणि २ मॅमोग्राम केले आहेत. तुम्‍हाला कुठले लक्षण दिसले तर तत्‍काळ उपचार करा.” असा सल्लाही तिने दिला आहे. ताहिराने हॉस्‍पिटलमधून एक फोटोदेखील शेअर केला होता.