‘शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर कारवाई करा’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे व विनापरवानगी आपल्या मोबाईलमधील डाटा डिलीट करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्याथ्यांर्नी शासनाकडे केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना निवेदन दिले.

गत दोन दिवसांपासून विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेने पायी मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे परवानगीही मागितली; मात्र कायदा व सुव्यवस्थेची भिती दाखवित विद्यार्थ्यांना मोर्चा काढण्यापासून परावृत्त केले, अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी खासगीत दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला नाही; मात्र जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायीच जाऊन त्यांनी निवेदन दिले.

दरम्यान, पोलीस मात्र सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवूनच होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे म्हटल्या जाते. आम्हाला तेच दूध प्यायचे असताना, शिक्षणमंत्री मात्र नोकरीच्या नावाने मेंढीचे दूध पिण्याचा सल्ला देत आहे. याचा अर्थ गरिबांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊ नये काय, असा प्रतिप्रश्नही विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला.

श्री शिवाजी व कला वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवार, ४ जानेवारी रोजी वादविवाद स्पर्धा पार पडली. त्यावेळी पत्रकारिता अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रशांत शिवा राठोड याने गरीब विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत प्रश्न केला. त्यावर विनोद तावडेंनी कार्य्रकमातून बाहेर जाता जाताच अत्यंत उद्दामपणाचे उत्तर दिले. त्या सर्व संभाषणाचे युवराज दाभाडे हा विद्यार्थी मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करीत होता. त्यामुळे त्याचा मोबाईल जप्त करुन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचे आदेश विनोद तावडेंनी दिले; मात्र हा सर्व प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा होता.