तटकरे, रायगड तुम्ही सांभाळा, मी रत्नागिरी संभाळतो ! 

खेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची उमेदवारी माझे मित्र सुनील तटकरे यांना मिळाली आहे. तटकरेसाहेब तुम्ही एकटे नाहीत. माझी तुम्हाला सदैव साथ असेल, असं  भास्कार जाधव यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

निवडणुकीच्या प्रचाराची राळ उठेल त्यावेळी तटकरे-जाधव जोडी विरोधकांना सैरभैर करून सोडेल. त्यावेळी सारा हिशेब आम्ही दोघे मिळून चुकता करू,’ अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. ‘तटकरे, रायगड तुम्ही सांभाळा, मी रत्नागिरी संभाळतो,’ अशी ओळही त्यांनी यावेळी येथे जोडली.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाही बिघडली आहे. त्याचा थेट परिणाम कोकणातील पर्यटनावर झाला आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत कोकणात अनेक खून झाले. गृहखाते मुख्यंमत्र्यांकडे आहे. त्यांचा वचक राहिलेला नाही. चिपळूण येथे रामदास सावंत, खेड येथे अंकिता जंगम, अंकिता चव्हाण, गुहागरमध्ये सकपाळ बंधू यांचा खून झाला. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवायला सुरवात केली आहे. अद्यापही या साऱ्या घटनांमध्ये आरोपी हाती लागलेले नाहीत, असं जाधव यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. परंतु चोरटे पकडले गेले नाहीत. अंकिता जंगम खुनानंतर समस्त जंगम समाज खेड येथे उपोषणासाठी बसला. पोलिस अधीक्षकांनी खेडमध्ये येऊनही उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरचा विश्‍वास उडाला आहे, असं ही त्यांनी यावेळी म्हटलं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा थेट परिणाम कोकणच्या पर्यटनावर होऊ लागला आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.