महत्वाच्या बातम्या

‘त्या’ कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तावडे ; समारोपाला फडणवीस, गडकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज यवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात होत आहे. उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर यामागे सत्ताधाऱ्यांचे आदृश्य हात असल्याचा आरोप होत होता. आयोजकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारवर आरोप करणारे भाषण नको म्हणून हे उपद्व्याप केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता आजच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी भाषा मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. तर रविवारी होणारा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वत: तावडे यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. सहगल प्रकरणामुळेच मुख्यमंत्री उद्घाटनाऐवजी समारोपाला येणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांऐवजी मी उपस्थित राहणार आहे. रविवारी होणारा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहगल यांचे भाषण झाले तर ते सर्वांसाठी अडचणीचे ठरेल, असे स्वागताध्यक्ष तसेच वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा या आयोजक संस्थांचे पदाधिकारी यांना वाटत होते. स्वागताध्यक्ष आणि यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी संमेलनाला मदत करणार नसल्याचे संकेत दिल्याने सहगल यांना तुम्ही येऊ नका, असे आयोजकांनी कळविले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहगल यांचे भाषण नको, हा आयोजकांचा अट्टाहास निरर्थक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर सहगल यांचे भाषण स्फोटक ठरले तर आपण अडचणीत येऊ, या विचारातून आयोजकांनी सहगल यांना येऊ नका, असे कळविले. पण, मुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाऐवजी समारोपाला उपस्थित राहणार असल्याने सहगल नको, हा आयोजकांचा तसेच पालकमंत्री असलेल्या स्वागताध्यक्षांचा अट्टाहास व्यर्थ ठरल्याची चर्चाही सुरू झाली आहे. दुसरीकडे, वाद सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनीच संमेलनाला जाण्याचे टाळले का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या