नक्कल करतो, म्हणून सरांने केली काठीने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्टेजवर कोणाची नक्कल केली तर, त्याला बक्षीसाबरोबर टाळ्या मिळतात. पण, एका मुलाला नक्कल केल्याने सरांचा मार पडला. मोशीमधील बोहाडेवाडी येथील नूतन महानगर पालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला असून शाळेतील हिंदीच्या शिक्षकांनी १४ वर्षाच्या मुलाला हाताने व काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी शिक्षक कळसाईत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मोशी येथे राहणाऱ्या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचा १४ वर्षाचा मुलगा बोहाडेवाडीतील नुतन महानगर पालिकेच्या शाळेत शिकतो. हा मुलगा आपली नक्कल करतो, असे कळसाईत सर यांना समजले. त्या रागातून त्यांनी शाळा सुटल्यावर या मुलाला थांबून ठेवले. त्याच्याकडे आपली नक्कल का करतो, असा जाब विचारुन त्याला हाताने व काठीने पाठीवर बेदम मारहाण करुन जखमी केले. काही वेळानंतर त्याला सोडून दिले. हा मुलगा घरी आला व त्याने घडला प्रकार आपल्या आईला सांगितला.

त्याच्या पाठीवरील वळ पाहून आईने त्याला घेऊन भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.