मास्तरांचा पुन्हा असहकार, बारावी परिक्षेकडे पाठ फिरवण्याचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यभर ११ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जाणार आहे. शासनाने याची योग्य ती दखल न घेतल्यास फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षा काळात ‘असहकार आंदोलन’ करणार असल्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दिला आहे. यामुळे राज्यभरातील सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या कार्यकारिणीची नुकतीच येथे सभा झाली. या सभेत हा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांबाबत शिक्षण मंत्र्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देऊन अनेक आंदोलने करण्यात आली. मात्रयानंतरही चार वर्षे झाली तरी मान्य केलेल्या विविध मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. शासनाकडून शिक्षकांची अशी वारंवार फसवणूक होत आहे. त्यामुळे ११ जानेवारीला राज्यातील तालुका तहसीलदारांना, आमदारांना व मंत्र्यांना निवेदने देण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक विभागात ३० जानेवारीस म. गांधी पुण्यतिथीस मूक मोर्चा काढण्यात येईल आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शासनास निवेदने देण्यात येणार आहेत.